मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

जगातला पहिला एक्स रे फोटो

२२ डिसेंबर १८९५, जर्मनीतील वूर्झबेर्ग विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत एक ५० वर्षांचा, दाढीवाला, कुरळ्या केसांचा, म्हातारपणाकडे झुकलेला व्यक्ती फोटोग्राफिक प्लेटवर एका विशिष्ट किरणांचा काय परिणाम होतो हे शोधण्याचं काम करत होता, ते किरण त्यानेच दीड महिन्याआधी शोधून काढले होते अर्थात त्याला ते अनपेक्षितपणे सापडले होते. ते होते क्ष किरण किंवा एक्स रे आणि ती व्यक्ती होती आपलं अख्खं आयुष्य संशोधनासाठी खर्च केलेला, आपली सर्व संपत्ती राष्ट्राच्या नावे अर्पण करून एकही पेटंट न मिळवता कफल्लक अवस्थेत मेलेला विल्यम रंटजेन, भौतिकशास्त्राचा पाहिला नोबेल पारितोषिक विजेता.
कुठल्याही पदार्थाचा प्रदीप्ती गुणधर्म शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रूक्स ट्यूब मधून अदभूत असे किरण पाहून रंटजेन खूपच उत्साही झाला होता आणि रात्रंदिवस तो या नवीन किरणांचे गुणधर्म शोधण्यात गुंतला. या किरणांना एक्स रे हे नावसुद्धा त्याने देवून टकले होते. हे सर्व करत असतांना त्याच्या जेवणाच्या वेळा चुकत असत कधी कधी तर दोन दोन दिवस बायकोला त्याचे तोंड दिसत नसत त्याच्या प्रकृतीची अशी आबाळ बघतांना ती कंटाळली होती, चिडत होती पण काही करू शकत नव्हती.
आज मात्र न रहावून ती त्याच्या प्रयोगशाळेत घुसली आणि अक्षरशः त्याच्यावर ओरडली, तु जेवायला येतोयस का मी रोजच्यासाखं एकटीनेच जेवावं?
एक मिनिट फक्त, तिथेच थांब आणि कशालाही हात लावू नको शांतपणे त्याने उत्तर दिले आणि एक फोटोग्राफिक प्लेट त्याने मशीनवर ठेवून त्यावर क्ष किरणांचा मारा केला. एवढे करूनही हा ऐकत नाही म्हटल्यावर मात्र तिचा पारा चढला आणि तिने त्याला धमकी दिली, जर तु आत्ता जेवायला आला नाही तर मी कुणाबरोबरही पळून जाईन. खरं तर हे त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं. तो म्हणाला, खरचं, जा तू म्हणजे मला कामासाठी खूप वेळ मिळेल एवढे ऐकल्यावर ती त्याला मारायला धावली आणि अचानक तिचा हात त्या फोटोग्राफिक प्लेटवर पडलेला पाहून तो ओरडला, अगं ऐ, हे काय केलंस? काय झालंय म्हणून बघायला तिने मागे पाहिलं आणि आपला हात झटकन मागे ओढला. एक प्लेट वाया घालवलीस तू”, हे बोलत असतांना त्याने ती प्लेट हातात घेतली आणि,  “पण हे काय?म्हणत त्याने ती प्लेट समोर धरली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
त्याने ती प्लेट तिच्या समोर धरली आणि तिने तोंडात बोटे घातली, हा माझा हात काय?
नाही ही तुझ्या बोटांची हाडं, कुठल्याही फ्रॅक्चरशिवाय आपल्या शोधाचं महत्व ताबडतोब कळण्याएवढा रंटजेन नक्कीच हुशार होता.
तो जगातला पहिला एक्स रे फोटो होता.

टिप्पण्या