मुख्य सामग्रीवर वगळा

विज्ञान कविता आणि गीतं

4. आण अग्नीची भाकतो

"आण अग्नीची भाकतो, आम्ही आण अग्नीची भाकतो |

स्वतः जळतो, जगा उजळतो", आम्ही आण अग्नीची भाकतो || ध्रु ||

छात्र आहे विज्ञानाचा, तिमिर नाशे अज्ञानाचा |

अज्ञान प्रयत्ने झाकतो, आम्ही आण अग्नीची भाकतो || १ ||

कास धरुनी विज्ञानाची, शिकस्त करुनी प्राणपणाची |

विज्ञानी भूचरणी वाकतो, आम्ही आण अग्नीची भाकतो || २ ||

ज्ञानार्थी जरी विदेशी जाऊ, मायभूमिसी परतुनी येऊ,

दिले वचन न टाकतो, आम्ही आण अग्नीची भाकतो || ३ ||

आकर्षणाचे कितीही मोके, आम्ही जाणतो त्याचे धोके |

दृढनिश्चये ते टाळतो, आम्ही आण अग्नीची भाकतो || ४ ||

विज्ञानाचा असेल दर्पण, भरतभूमीचे त्याते दर्शन |

किरणप्रकाशे जगी फाकतो, आम्ही आण अग्नीची भाकतो || ५ ||

इथे जन्मले बहु वैज्ञानिक, स्वदेशसेवे इथेच स्थायिक |

आदर्श आम्ही राखतो, आम्ही आण अग्नीची भाकतो || ६ ||

विज्ञानाचे पाईक आम्ही, स्वदेशसेवा करण्या नामी |

जन्म तिजचरणी वाहतो, आम्ही आण अग्नीची भाकतो || ७ ||


© कवी : उपेंद्र चिंचोरे


3. तेजोनिधी लोह गोल

तेजोनिधी लोह गोल, भास्कर हे गगनराज

हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज


दिव्य तुझ्या तेजाने, झगमगले भूवन आज

हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज


कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती

अमृतकण होऊन, अणुरेणू उजळिती

तेजातच जनन मरण , तेजातच नवीन साज   

हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज


ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्य सभा

दाहक परि संजीवक, करुणारून किरणप्रभा

होवो जीवन विकास, वसुंधरेची राख लाज

हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज


तेजोनिधी लोह गोल, भास्कर हे गगनराज

हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज


कवी- पुरुषोत्तम दारव्हेकर

नाटक- कट्यार काळजात घुसली


2. विज्ञानगीत

संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला |

लागल्या वाटा दिसाया, शक्ती दे चालण्याला ||धृ||


विश्व हे होते धुक्याने वेढलेले, झाकलेले |

अंधश्रध्दांनी जगाचे, मार्ग होते घेरलेले |

ज्ञानविज्ञानातुनी ते सत्य आता प्रत्ययाला

संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला ||१||


गूढ सृष्टीचे कळाया; ध्यास ज्यांचे श्वास झाले

पीडितांचे दुःख जाता; सौख्य ज्यांना लाभलेले |

थोर या ज्ञानी जनांंचा; वारसा आम्हां मिळाला 

संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला ||२||


सत्य आहे जीवनी ते; पाहण्या दृष्टी मिळावी

सत्य जे - जे ये पुढे ते; साहण्याची वृत्ती यावी |

मानवासंगे जपावे सृष्टीच्याही वैभवाला

संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला ||३||


विश्व संचारास आता; आपणांला लाभलेले

मानवाचे हात आता; ते ग्रहांशी पोचलेले |

सिध्द आम्हीही नवे आव्हान हे पेलावयाला

संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला ||४||


गीत- श्री. शंकर वैद्य आणि श्री सतिश सोळांकूरकर

संगीत- श्री यशवंत देव

गायन- श्रीमती मीनल देशपांडे आणि इतर


1. रक्तपिपासू

आम्ही इवले इवले

ओबडधोबड

रक्तपिपासू, समाजशोषक, समाजकंटक

म्हणूनी हिणवू नका-

आमच्या टिचभर पोटाला, थेंबभर

रक्ताचा आधार- पण तेव्हढं द्यायलाही

तुमची मात्र कुरबूर

तुमच्या रक्ताचा एक थेंब दुसऱ्याचं

जीवन वाचवू शकतो म्हणून टाहो

करीत बाटल्या बाटल्या रक्त गोळा

करणारा तू- थेंबभर रक्ताला

महाग होतो आमच्यासाठी!

पण आम्हीसुद्धा मोरारजीभाईंचे

पक्के चेले- बाटलीला शिवत नाही

रक्त हवे ताजेतवाने धमनीमधले

मारा मारा डीडीटीचा फवारा

किंवा अश्रूधूर सोडा- अन् तुम्ही

तुमच्याच डार्विनचे की फार्विनने

सांगितलेलं तत्त्व साफ विसरला-

Survival of the fittest-

"लायक तेवढाच तगतो"-

आम्ही शिकलो त्याच्याकडून

करा नवीन औषधांचा मारा-

आम्ही देऊ गुंगारा- कारण

आम्हालाही जगायचं आहे

तुमच्यासारखंच अन् तुमच्या रक्तावर,

रक्त आमचं अन्न आहे-

नाहीतर बनवा आमच्यासाठी दुसरं अन्न

म्हणजे आम्ही तुमच्या रक्ताच्या वाट्याला जाणार नाही.


डॉ. प्रभाकर प्रल्हाद जामखेडकर

(मुंबई- १६/०३/१९७८)

कविवर्य नारायण सुर्वे यांनी प्रशंसलेली, आकाशवाणी संमेलनात प्रसारित कविता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

मोबाईलची बॅटरी 100% झाल्यावर चार्जिंगला लावून ठेवली तर काय होते?

“मोबाईलची बॅटरी 100% झाली आहे, आता चार्जर काढ!” आपण घरात ही सूचना अनेकदा ऐकतो. पण खरंच 100% चार्ज झाल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला तर बॅटरी खराब होते का? मोबाईलचा स्फोट होऊ शकतो का? की आधुनिक मोबाईल स्वतःच चार्जिंग नियंत्रित करतात? चला, या रोजच्या जीवनातील प्रश्नामागचे विज्ञान समजून घेऊया!  सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट... आजच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) किंवा लिथियम-पॉलिमर (Lithium-polymer) बॅटरी वापरली जाते. या बॅटरीमध्ये चार्जिंगचे नियंत्रण करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असते. त्यामुळे बॅटरी 100% झाल्यानंतर चार्जर पूर्वीसारखा सतत मोठ्या प्रमाणात विद्युतप्रवाह बॅटरीमध्ये ढकलत राहात नाही. म्हणजेच— “100% झाल्यावरही बॅटरीमध्ये सतत वीज भरत राहते” — हे योग्य नाही. मात्र याचा अर्थ 100% चार्ज झाल्यावर मोबाईल कायम चार्जिंगला ठेवणे पूर्णपणे चांगले आहे, असेही नाही. मग नेमके काय होते? 100% झाल्यावर चार्जिंग कसे नियंत्रित होते? मोबाईलमध्ये बॅटरीचे तापमान, व्होल्टेज आणि चार्जची स्थिती तपासणारी Battery Management System (BMS) किंवा संबंधित चार्जिंग नियं...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...