नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते.
संशोधन
बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये.
या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.
घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर दिव्यांमधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो. ह्या सर्व उदाहरणांमध्ये सोडिअम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा उत्सर्जित करतो. सोडिअम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक ठराविक असतात. हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जेइतका असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणांमध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचे दिसते.
कार्य
बोर यांनी कोपनहेगन विद्यापीठात 'Institute of theoretical physics' या संस्थेची स्थापना केली, जी आता १९२० साली सुरू झालेली 'नील्स बोर इन्स्टिट्यूट' म्हणून ओळखली जाते.
१९३० च्या दशकात बोर यांनी नाझीवादातून सुटून आलेल्या निर्वासितांना मदत केली.
युद्धानंतर बोर यांनी अणुऊर्जेबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आवाहन केले. हिग्ज बोसॉन कणांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्युक्लियर रिसर्च (सर्न)' या प्रयोगशाळेची स्थापनासुध्दा नील्स बोर यांनीच केली आहे.
१९५० च्या दशकात नील्स बोर हे मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टी. आय. एफ. आर.) येथे भाषण देण्यासाठी आले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा