सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे.
अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय?
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही.
मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी:
पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिनिटे म्हणजे 9 कोटी किलोमीटर असेल हे चूक आहे कारण पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील साधारण अंतर 15 कोटी किलोमीटर असून ते 8.3 प्रकाश मिनिटे आहे म्हणजे प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रवास करायला 8.3 मिनिटे (8 मिनिटे 20 सेकंद) लागतात.
अपसूर्य काळात सूर्यपृथ्वी अंतरात 66% (9 कोटी किलोमीटर ते 15.2कोटी किलोमीटर) एवढी वाढ होईल हे पण चुकीचे आहे. या काळात सूर्यपृथ्वी अंतरात होणारी वाढ फक्त 3.3 % (14.7 कोटी किलोमीटर ते 15.2कोटी किलोमीटर= 50 लाख किलोमीटर) एवढीच असेल.
थंड हवामान जाणवेल आणि त्यामुळे सर्दी, फ्लू, खोकला इ श्वसनाचे रोग वाढू शकतात तर असे काही होणार नाही आणि झाले तरी त्याचे कारण अपसूर्य स्थिती नसेल कारण या स्थितीमुळे अंतरात जो बदल होतो तो नगण्य आहे आणि त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा