विल्यम हर्षल यांना 13 मार्च 1781 रोजी स्वतः बनवलेल्या दुर्बिणीच्या सहाय्याने अवकाश निरीक्षण करतांना युरेनस या ग्रहाचा शोध लागला. या शोधाबरोबरच खगोलशास्त्रात एक समस्या उभी राहिली. न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार युरेनसची भ्रमणकक्षा आणि त्याची प्रत्यक्ष भ्रमणकक्षा यांत तफावत आढळून येत होती. हे असं का होतं असावं? न्युटनचा नियम तर चुकला नसेल ना? युरेनस असं का वागत असेल? असे प्रश्न उपस्थित झाले. बरीच लोकं यावर काम करत होती. सर्व बाजूंनी विचार करून कुणालाही उत्तर मिळत नव्हते.
1841 साली केंब्रिज विद्यापीठात खगोलशास्त्र शिकणाऱ्या जॉन अॅडम्स या विद्यार्थ्याला मात्र न्युटनच्या नियमावर विश्वास होता. त्याला असं वाटलं की युरेनसच्या भ्रमणकक्षेवर परिणाम करणारं एखादं गुरूत्वबल ग्रहाच्या स्वरूपात असावं आणि न्युटनच्या नियमाप्रमाणेच ते युरेनसवर कार्य करत असावं. मग या भल्या मोठ्या अवकाशात तो ग्रह शोधायचा कसा? यावर त्यानं वेगळीच शक्कल लढवली. त्याच्या मते या ग्रहावर सुर्य, गुरू, शनी व युरेनस यांचं गरूत्वबल कार्यरत असेल मग त्यानं सुर्यापासून या ग्रहांची अंतरं बघितली असता एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्याच्या लक्षात आली ती म्हणजे शनिचे सुर्यापासूनचे अंतर गुरूच्या सुर्यापासूनच्या अंतराच्या सुमारे दुप्पट आहे आणि युरेनसचे सुर्यापासूनचे अंतर शनिच्या सुर्यापासूनच्या अंतराच्या जवळजवळ दुप्पट आहे. यावरून तर्काच्या आधारावर शोधत असलेल्या नव्या ग्रहाचे सुर्यापासूनचे अंतर काढले. एवढं करून पुरेसं नव्हतं तर युरेनसच्या बदलेल्या कक्षेवरून त्या ग्रहाची गती आणि अवकाशातील स्थानही गणिताने शोधावं लागणार होतं. ही सारी गणितं पुर्ण होण्यासाठी 1845 साल उजाडावं लागलं. एवढं करूनही अवकाश निरीक्षणासाठी शक्तिशाली दुर्बिण वापरण्याची परवानगी अॅडम्सला मिळाली नाही.
23 सप्टेंबर 1846 रोजी बर्लिन वेधशाळेतून या गणिताच्या आधाराने अवकाश निरीक्षण करतांना गॉटफ्रिड गॉल व हेन्रीच दारे या दोघांना हा नवीन ग्रह सापडला तो म्हणजे नेपच्यून.
इतिहासात प्रथमच कागदावरील गणिताच्या सहाय्याने अवकाशातील ग्रहाचा शोध लागला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा