काल रिचर्ड डॉकिन्स यांनी लिहिलेलं व डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी भावानुवाद केलेलं 'जादूई वास्तव' हे पुस्तक वाचून झालं. काही पुस्तकं अशी असतात की संपल्यानंतर सुध्दा काहीतरी शिल्लक आहे अजून, पुन्हा-पुन्हा वाचायला हवं अशी हूरहूर लावून जातात. अगदी तसंच हे पुस्तक!
विवेक जागर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. विज्ञान आणि निसर्गाबद्दल कुतुहल असणाऱ्या कुणाही व्यक्तीनं वाचावं, खरं तर प्रेमात पडावं, असं पुस्तक आहे.
हे पुस्तक वाचावं किंवा वाचकाने यांच्या प्रेमात पडावं याची बरीचशी कारणं आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळ पुस्तकाचा केलेला हा भावानुवाद आहे. अनुवादित केलेली बरीच पुस्तकं असतात पण लेखकांचं म्हणणं तितक्याच प्रभावीपणे आणि तितक्याच ओघवत्या शैलीत वाचकांपर्यंत पोहोचवणं हे महाकर्मकठीण. मुळ पुस्तकातील संदर्भांना अनुसरून मायभाषेतील (प्रादेशिक) उदाहरणे, प्रसंगी काव्याची आणि आणि अभंगांची फोडणी देऊन मुळ ग्रंथाच्या तोडीसतोड साहित्यनिर्मिती (भावानुवाद) ही आणि अशी आणखी काही वैशिष्ट्ये या पुस्तकाची सांगता येतील.
या पुस्तकाच्या गाभ्याविषयी सांगायचं म्हटलं तर प्रस्तावनेतील एक उतारा इथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही पण यातूनच पुस्तकाशी आपली ओळख होईल.
'जादूई वास्तव यात अभिप्रेत असलेला अर्थ काव्यात्मक जादू असा आहे. संगीताचे स्वर, इंद्रधनुष्य, रंगांची उधळण करणारा सूर्यास्त आपल्या अंगावर शहारा आणणारं आणि जगण्याचा तो क्षण मोहरून टाकणारं असतं. विज्ञानाच्या आधारे गवसलेलं सत्य हे असंच विलक्षण जादुई असतं, अंगावर शहारा आणणारं असतं, तरल, काव्यात्मक असतं. हे दाखवून देण्याचा आणि या विज्ञानानंदात आपणाला शरीक करून घेण्याचा खेळ या पुस्तकात पानोपानी मांडला आहे.'
संपूर्ण पुस्तक वाचल्यावर वरील वाक्यांची अनुभूती हे पुस्तक देतं आणि पुन्हा-पुन्हा या विज्ञानानंदात डुंबून भिजण्याची इच्छा होते.
हा भावानुवाद इतका कडक होण्यामागे मुळ पुस्तकाचा आशय कारणीभूत असावा कारण वाचल्यावाचल्याच या पुस्तकाचा अनुवाद करायचं हे डॉ. अभ्यंकर यांनी ठरवलं. त्यांच्या मते अद्भुताच्या अनुभूतीबरोबरच विज्ञानाच्या विचारपद्धतीवर इतकं झकास भाष्य करणारं पुस्तक विरळा.
जे माहीत नाही ते माहीत असल्याचा आव विज्ञान आणत नाही. सगळं काही समजलंय असा विज्ञानाचा दावा नसतोच मुळी आणि यामुळेच सतत सत्याच्या अधिकाधिक निकट जाण्याचा प्रयत्न विज्ञान करत असतं. सगळं माहीत आहे म्हटल्यावर सत्याचा शोध थांबतो ही बाब प्रभावीपणे हे पुस्तक मांडतं. खूप साध्या-साध्या प्रश्नांपासून काही गहन प्रश्र्न आणि त्यांची उत्तरे अगदी साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेत देण्याचा प्रयत्न हे पुस्तक करतं. याचबरोबर खूप सार्या मिथककथा आणि पुराणकथाही या पुस्तकात वाचायला मिळतात आणि या पुराणकथांना कधी न विचारलेले गेलेले मार्मिक प्रश्नही हे पुस्तक विचारतं.
विज्ञानाला माहिती असलेलं सगळं ज्ञान किंवा माहिती हे पुस्तक देतं असंही नाही पण या पुढे काय असावं? या जिज्ञासेची जाणीव मात्र हे पुस्तक नक्की देतं.
Thanks for sharing this information..
उत्तर द्याहटवा