१५ डिसेंबर १८५२ रोजी जन्मलेल्या हेन्री यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेवूया. १८९६ सालापर्यंत स्फूरदिप्ती बद्दल बरीच माहिती होती. काही पदार्थ सूर्यप्रकाश शोषून घेतात व सूर्यप्रकाशातून घेतलेल्या लहरी किंवा किरणे काही वेळाने पुन्हा उत्सर्जित करतात. अमावसेच्या रात्री स्मशानात जे चमकतांना दिसते ते मानवाच्या शरीरातील स्फुरद किंवा फोस्परस असते. प्राचीन काळापासून या गुणधर्माची निरीक्षणे होत होती. हेन्री यांच्या वडिलांनी सुध्दा यांवरकाम केले होते. स्वतः हेन्री यांचे सुरुवातीचे संशोधन हे स्फूरदिप्तीसंबधीच होते. १८९५ साली विल्यम रंटजेन यांना एक्स रे चा शोध लागला आणि आणखी कुठल्या पदार्थांतून एक्स रे बाहेर पडतात हे शोधण्यासाठी स्पर्धा लागली. यावेळी हेन्री युरेनिअमच्या क्षारांवर प्रयोग करत होते आणि या क्षरांमधून सुध्दा एक्स रे बाहेर पडत असतील का? असा प्रश्न त्यांना पडला व याचा शोध घेण्यासाठी त्यांनी युरेनिअमचे क्षार काळ्या कागदात गुंडाळलेल्या फोटोग्राफीक प्लेटवर ठेवून ती सूर्यप्रकाशात धरली व नंतर त्या प्लेटचे निरीक्षण केले तर त्यांना ती प्लेट ढगाळलेली दिसली म्हणजे या क्षरांतून सुध्दा एक्स रे बाहेर पडतात असे दिसत होते. पडताळून बघण्यासाठी पुन्हा एकदा प्रयोग करायचे त्यांनी ठरवले पण बरेच दिवस ढगाळ वातावरणाने ते शक्य झाले नाही. शेवटी कंटाळून त्यांनी पुन्हा तयार केलेली प्लेट तशीच्या तशी टेबलाच्या एका कप्प्यात ठेवून दिली. काही दिवसांनी त्या प्लेटचे निरीक्षण केल्यावर आताही त्यांना ती प्लेट ढगाळलेली दिसत होती म्हणजे सूर्यप्रकाशात नसतांनाही युरेनिअम मधून कुठलेतरी किरण बाहेर पडत होते आणि हे स्फूरदिप्तीपेक्षा वेगळे काहीतरी होते हे त्यांच्या लक्षात आले. हाच किरणोत्सारितेचा शोध होता ज्यासाठी १९०३ साली त्यांना मेरी क्युरी व प्येर क्युरी यांच्यासमवेत भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. युरेनिअमच्या या गुणधर्माला किरणोत्सार (Radioactivity) हे नाव मेरी क्युरी यांनीच दिले होते. आपण शोधलेले किरण हे एक्स रे नाहीत हे सिद्ध करण्यासाठी सुध्दा त्यांनी प्रयोग केला होता. त्यांनी या किरणांना चुंबकीय क्षेत्रातून सोडले असता त्यातल्या काही किरणांनी आपली दिशा बदलली आणि हे एक्स रे च्या बाबतीत होत नव्हते हे सिद्ध झालेले होते. अशा या महान शास्त्रज्ञाला त्याच्या जन्मादिनामित्त अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा