काल दुपारनंतर झालेल्या पावसाने दिल्लीकरांना दुहेरी आनंद दिला. एक म्हणजे गरमीच्या तडाख्यातून थोडासा थंडावा मिळाला आणि दुसरे म्हणजे दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन झाले. तसे पाहता दुहेरी इंद्रधनुष्य ही काही आश्चर्याची गोष्ट नसली तरी ती नेहमीच दिसते असेही नाही त्यामुळे त्याबद्दल नवल ते कायम असते.
प्रकाशाचे काही गुणधर्म असतात जसे की परावर्तन, अपवर्तन, अपस्करण इ. या सर्व गुणधर्मांचा एकत्रित परिपाक म्हणजे इंद्रधनुष्य होय. प्रकाशकिरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतांना माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात आणि थेंबाच्या मागील पृष्ठभागावरून परावर्तित होतात. एकदा परावर्तित झालेले किरण थेंबातून बाहेर पडताना पुन्हा एकदा माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये सुर्यकिरणांतील विविध तरंगलांबीच्या प्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन वेगवेगळ्या कोनांतून होत असल्याने सात तरंगलांबीचे रंग वेगवेगळे होतात आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो.
आता गंमत अशी आहे की काही वेळा पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाशाचे परावर्तन एकदा न होता दोनदा होते. सुर्य क्षितिजापासून जवळ म्हणजे खूप खाली असेल तेव्हा असं होण्याची शक्यता जास्त असते आणि अशावेळी आपल्याला दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन होते.
दुहेरी इंद्रधनुष्याच्या बाबतीत गमतीची गोष्ट अशी आहे की यातील दुय्यम इंद्रधनुष्यामध्ये ता ना पि हि नि पा जा हे रंग उलटे दिसतात. याचं कारणही प्रकाशाचं दोनदा होणारं परावर्तन हेच आहे.
हा दुय्यम इंद्रधनुष्य मुख्य इंद्रधनुष्याच्या वरच्या (बाहेरील) बाजूला अस्पष्ट व पसरट दिसतो. पाण्याच्या थेंबामध्ये जास्तीत जास्त तीन वेळा प्रकाशाचे परावर्तन होऊ शकते पण त्यामुळे तयार होणारा तिसरा इंद्रधनुष्य आपल्याला दिसू शकत नाही कारण तो सुर्य असलेल्या बाजूला असतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा