गेल्या एक-दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे चर्चेचा विषय ठरले आहे याचं कारण म्हणजे लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदललेला दिसतोय. एरवी निळेशार दिसणारे पाणी चक्क गुलाबी दिसायला लागले आहे.
याबाबत तुर्तास कोणताही निष्कर्ष काढणे कठीण असले तरी काही तर्क मात्र तज्ञांकडून लावले जात आहे. लोणार सरोवरातील पाण्यात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या बुरशीची वाढ जास्त प्रमाणात झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते निसर्ग चक्रीवादळामुळे झालेला वातावरणातील बदल आणि सरोवरातील पाण्याची खालावलेली पातळी ही यासाठी कारणीभूत ठरली असावी.
लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे 52000 वर्षांपूर्वी 20 लाख टन वजनाच्या व 90000 किलोमीटर प्रती तास या वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळलेल्या उल्कापातामुळे झाली आहे.
लोणार सरोवराचा आकार हा अंडाकृती असून साधारणपणे 1200 मीटरचा व्यास व 137 मीटर खोलीचे तळे या उल्कापातामुळे तयार झाले आहे. लोणार सरोवरातील पाणी हे खारं असून ते अल्कलीधर्मी आहे. लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचं आणि उल्कापातामुळे तयार झालेलं (हे दोन्ही गुणधर्म एकत्रितपणे असणारं) जगातील एकमेव ज्ञात सरोवर आहे.
उल्कापातामुळे तयार झालेल्या सरोवरांचे कालानुरूप विघटन होत जाते आणि काही अवशेषांच्या स्वरूपात टिकून राहतात त्यापैकी एक लोणार सरोवर आहे. बेसाल्ट खडकांमध्ये मुख्यतः ज्वालामुखीनिर्मित सरोवरं असतात पण लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकांमध्ये उल्कापातामुळे तयार झालेलं सर्वात मोठं सरोवर आहे. याशिवाय जगात अशी फक्त तीनच सरोवरे ज्ञात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा