आजचे चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण होते पण ते पृथ्वीच्या ठराविक प्रदेशातूनच दिसले आणि त्यावेळी चंद्र लाल रंगाचा दिसून आला याला इंग्रजीत ब्लड मून म्हणतात. हे ब्लड मून काय असतं? चंद्राचा रंग लाल का दिसतो? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पृथ्वीच्या वातावरणातच मिळू शकतील पण त्यासाठी आणखी मूळ प्रश्न विचारले पाहिजे की आकाशाचा रंग निळा का दिसतो? रात्री आकाश काळे का दिसते? सूर्य सकाळी आणि संध्याकाळी लालसर आणि दुपारी पिवळा का दिसतो? किंवा मग कोणत्याही वस्तूला स्वतःचा असा रंग असतो का नसतो? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला या ब्लड मूनचं रहस्य कळेल. चला तर मग जाणून घेऊया.
कोणतीही वस्तू आपल्याला तेव्हा दिसते जेव्हा त्या वस्तूवर प्रकाश पडतो म्हणजेच अंधारात आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही. वस्तूवर पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडला की मग ती वस्तू आपल्याला दिसते म्हणजेच एखाद्या भिंतीच्या पलीकडील वस्तू मला दिसणार नाही. वस्तूवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा सर्वच्या सर्व प्रकाश काही आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही. ज्या रंगाचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो त्या रंगाची ती वस्तू आपल्याला दिसते म्हणजे मला टमाटे लाल दिसतात कारण टमाट्यांवर पडलेल्या प्रकाशाचा फक्त लाल रंग माझ्या डोळ्यांपर्यंत पोहचला मग बाकीच्या रंगांचे काय झाले? टमाट्यांवर पडलेल्या प्रकाशापैकी काही प्रकाश हा टमाट्यांमध्ये शोषला गेला तर काही प्रकाश टमाट्यांवरून इतरत्र पसरला गेला. हा इतरत्र पसरल्या गेलेला प्रकाश माझ्या डोळ्यांपर्यंत पोहचला नाही.
आता काही मूळ प्रश्न जसे की सूर्य सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेगळ्या रंगाचा का दिसतो?
सूर्यप्रकाश हा सात वेगवेगळ्या रंगांचा बनलेला आहे हे आपल्यला इंद्रधनुष्य बघितल्यावर लक्षात येते. सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याआधी अवकाश आणि मग पृथ्वीचं वातावरण पार करून येतो. पृथ्वीच्या वातावरणात वेगवेगळे वायू आहेत आणि या वायूंच्या कणांचा आकार अगदीच लहान आहे. या वायूंच्या कणांवर सूर्यप्रकाश पडतो आणि त्यापैकी काही पसरतो, काही शोषला जातो आणि मग उरलेला आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. कोणता रंग आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार हे सूर्यकिरणे वातावरणाचं किती क्षेत्र व्यापून आपल्यापर्यंत येतात यावर ठरतं. सूर्य सकाळी आणि संध्याकाळी क्षितिजावर असतांना ते वातावरणाच जास्त क्षेत्र व्यापतात म्हणून सूर्यकिरणे तिरपी पडतात, या जास्त क्षेत्रामुळे सूर्यप्रकाशातील कमी तरंगलांबीचा प्रकाश (निळा) सर्वात आधी पसरला जातो, त्यानंतर मध्यम तरंगलांबीचा (पिवळा) आणि उरलेला जास्त तरंगलांबीचा (लाल) प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचतो, म्हणून सूर्य सकाळी आणि संध्याकाळी लालसर दिसतो. दुपारी हे क्षेत्र कमी असल्याने मध्यम तरंगलांबीचा (पिवळा) प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचतो, म्हणून सूर्य दुपारी पिवळा दिसतो.
आता चंद्रग्रहणाच्या बाबतीत
चंद्रग्रहण होतं म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्याने सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहचत नाही आणि मग चंद्र झाकला जातो यालाच आपण चंद्राला ग्रहण लागलं असं आपण म्हणतो. काही वेळा चंद्राचा काही भाग झाकला जातो त्याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतो तर काही वेळेस संपूर्ण चंद्र झाकला जातो त्याला आपण खग्रास चंद्रग्रहण म्हणतो. खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी झाकला गेलेला भाग काळा दिसतो पण खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी मात्र तो लालसर दिसतो कारण पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या कणांवरून प्रकाश अपवर्तीत होऊन चंद्रापर्यंत पोहचतो आणि यावेळी पृथ्वीच्या वातावरणाच खूप जास्त क्षेत्र व्यापून मग हा प्रकाश चंद्रापर्यंत पोहचत असल्याने फक्त जास्त तरंगलांबीचा (लाल) प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो म्हणून चंद्र आपल्याला लालसर दिसतो.

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा