मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

कोपर्निकसच बरोबर असला पाहिजे

एकेकाळी बहुतेक सर्वजण मानत असे की पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी असून इतर सर्व ग्रह आणि तारे पृथ्वीभोवती फिरतात. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला या मान्यतेला धक्का देणारी एक हस्तपुस्तिका पोलंडमध्ये जन्मलेल्या मिकोलाज कोपर्निक ज्याला आपण आज निकोलस कोपर्निकस म्हणून ओळखतो याने स्वतः लिहून आपल्या मित्रांना वाटली. या हस्तपुस्तिकेत त्याने विश्वाची रचना मांडली ज्यामध्ये सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी तर इतर ग्रह आणि तारे सूर्याभोवती फिरतात. ही रचना पूर्णपणे बरोबर नसली तरी खागोलांच्या गतीबद्दल मानवाची समज वाढवण्यासाठी पुढील शास्त्रज्ञांसाठी ही पुस्तिका महत्वाची संदर्भ ठरली. चर्चला मात्र ही भूमिका मान्य नव्हती कारण चर्चच्या मते पृथ्वी आणि मानव सर्व विश्वात श्रेष्ठ आहे त्यामुळे सर्व विश्व हे पृथ्वीभोवतीच फिरलं पाहिजे. या हस्तपुस्तिकेतील रचना आणि स्वतः केलेली निरीक्षणे या आधारावर गॅलिलिओ आयुष्यभर चर्चसोबत भांडू शकला पण चर्चने कोपर्निकसला नेहमी खोटेच ठरवले. त्याच्या मृत्युनंतर कितीतरी वर्षांनी गॅलिलिओचे म्हणणे चर्चने सुद्धा मान्य केले की "कोपर्निकसच बरोबर आहे" आज 24 मे, निकोलस कोपर्निकस यांचा स्मृतिदिन कोपर्निकसच्या काळापर्यंत टोलेमीने मांडलेली विश्वाची रचना प्रचलित होती त्यामध्ये सर्व ग्रह पृथ्वीभोवती फिरत होते आणि पृथ्वी स्थिर होती मग असे असेल तर सर्व ग्रह आकाशात एकाच दिशेने प्रवास करतांना दिसून यायला हवे होते पण प्रत्यक्षात तसे होत नव्हते. वर्षभर निरीक्षण केले असता काही काळासाठी ग्रह पुढे जात काही काळासाठी त्यांचा वेग कमी होत जात, ते थांबत आणि मग चक्क परत मागे फिरत. काही काळानंतर परत ते आपल्या मूळ दिशेने प्रवास करत असत. या विसंगतीवर अभ्यास करून कोपर्निकसने मांडले कि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा इतर ग्रह आणि पृथ्वी शेजारी शेजारील मार्गांवरून सूर्याभोवती फिरत असतील आणि त्यांच्या वेगात फरक पडत असेल. म्हणजे दोन वाहने एकाच रस्त्यावरून शेजारून जात असतांना जर आपल्या वाहनाचा वेग जास्त असेल तर शेजारील वाहन आपल्याला मागे जात असल्याचे भासते. यावरून त्याने आपला सिद्धांत मांडला होता. कोपर्निकस हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने त्याचबरोबर चर्चमध्ये कॅनन म्हणून कार्य करत असल्याने त्यांनी पोपच्या भीतीने खूप काळापर्यंत आपली हस्तपुस्तिका प्रकाशित केली नाही. मृत्युच्या दोन वर्ष आधी ती त्यांनी प्रकाशित केली आणि सर्वप्रथम सर्वांनी ती नाकारली. पण गॅलेलिओला मात्र त्यावर आणि स्वतःच्या निरीक्षणांवर विश्वास होता आणि त्याने पुढाकार घेऊन कोपर्निकसने मांडलेली विश्वाची रचना योग्य असून चर्च ती नाकारत आहे या अर्थाचा लेख लिहला. यावरून चर्चने गॅलेलिओला कोर्टात बोलावले आणि सर्व ऐकून घेतल्यावर निर्णय दिला की कोपर्निकस चुकीचे सांगत आहे आणि टोलेमीच बरोबर आहे. पण चर्चमधून बाहेर पडताच गॅलेलिओ म्हटला की "कोपर्निकसच बरोबर असला पाहिजे" आणि कालांतराने चर्चने सुद्धा ते मान्य केले.

टिप्पण्या