इसवी सन पूर्व 276 साली इजिप्तमधील अलेक्झांड्रीया या शहरात जन्मलेले इरॅस्टोस्थेनीस हे गणितज्ञ, भूगोलतज्ञ, कवी, खगोलशास्त्र अभ्यासक व त्याचबरोबर संगीताची उत्तम जाण असलेलं व्यक्तिमत्व होतं. गणितातील विचारलेल्या संख्येपर्यंतच्या मुळसंख्या शोधण्याची प्रणाली त्यांनी विकसित केली होती जी आजही संगणकांमध्ये वापरली जाते. भूगोलामध्ये त्यांचं योगदान हे कायमस्वरूपी न विसरण्याजोगं आहे. जिओग्राफी ही संज्ञा वापरायला सुरूवात त्यांनीच केली होती, सर्वप्रथम पृथ्वीच्या कललेल्या आंसाचे माप त्यांनीच गणले, पृथ्वीच्या परिघाच्या मापाचा पहिला लिखित पुरावा हा त्यांच्याच नावे सापडतो, सुर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराची त्यांनी गणना केली याचबरोबर लीप दिवसाचा शोध सुध्दा त्यांनी लावला.
पृथ्वीचा परिघ त्यांनी कसा मोजला?
अन्य ग्रीक विचारवंताप्रमाणे पृथ्वी ही गोल आहे हे त्यांना मान्य होते. आजच्या आस्वान शहरातील, म्हणजे त्याकाळातील साईन शहरातील एका विहिरीत वर्षातील एका विशिष्ट दिवशी दुपारी भिंतींची सावली पाण्यावर पडत नाही हे सुध्दा ते ऐकून होते. त्यांनी अलेक्झांड्रीया शहर व साईन शहरातील ती विहीर हे अंतर मोजले. त्याचबरोबरीने त्या विशिष्ट दिवशी दुपारी अलेक्झांड्रीया शहरात एका काठीच्या सावलीवरून सुर्यप्रकाशाचा कोन मोजला. हा कोन 7.2 अंश (360 अंशाचा 50 वा भाग) एवढा भरला. यानंतर दोन शहरातील अंतराला त्यांनी 50 ने गुणले म्हणजे त्यांना 360 अंशामधील अंतर किंवा पृथ्वीचा परिघ मिळाला. तो 45,866 कि. मी. होता. आज माहिती असलेल्या 40,072 कि. मी. च्या जवळपास.
प्रत्यक्ष अंतर व त्यांनी मोजलेल्या अंतरामध्ये फरक का पडला असावा याचा विचार करा?
ज्या दिवशी त्यांनी सावली मोजली तो दिवस कोणता असावा?
याच प्रयोगावरून त्यांना अक्षांश व रेखांशाची कल्पना सुचली असेल का?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा